४ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी

मुलांना मराठी वाचायला शिकवा

आवाजापासून शब्दापर्यंत. मूल आधी ओळखीच्या शब्दांत आवाज ऐकतं, मग ते अक्षर ओळखायला शिकतं, तुमच्या शेजारी बसून वहीत लिहितं — आणि लवकरच खरे शब्द वाचू लागतं.

आवाजाचा खेळ: ‘म’ असलेल्या चित्रांना हात लावा
‘म’ लिहिण्याचा रेघ-क्रम
एक अक्षर कसं शिकतात

प्रत्येक अक्षराच्या चार छोट्या पायऱ्या

बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकाचाच क्रम — आधी आवाज, मग आकार, मग लिहिणं, आणि अक्षरं जमली की लगेच खरे शब्द.

१

ऐकूया

कशात “म” ऐकू येतो? मका, मोर, माती — ओळखीच्या शब्दांतून आधी आवाज.

२

अक्षर ओळखूया

आवाज ओळखीचा झाला की अक्षराचं स्वतःचं पान, नव्या चित्रांसह.

३

लिहूया

रेघा एकेक करून बघायच्या, मग खऱ्या वहीत लिहायचं. पालक बघून सांगतात — हे काम स्क्रीनला जमत नाही.

४

वाचूया

अक्षरं जमताच — काका, मामा, कमळ — मूल स्वतः शब्द जोडून वाचतं. असे १५६ शब्द.

तुमचाही सहभाग

शेजारी बसणाऱ्या आई-बाबांसाठी बनवलेलं

चार वर्षांचं मूल एकटं वाचायला शिकू शकत नाही, आणि शिकायलाही नको. अक्षरपाखरू तुम्हाला छोटी, स्पष्ट कामं देतं.

👀

वही बघा

प्रत्येक अक्षरानंतर मुलानं वहीत काय लिहिलं ते बघा आणि “छान लिहिलं” किंवा “पुन्हा लिहूया” दाबा.

🗣️

वाचलेलं ऐका

प्रत्येक टप्प्यावर मूल एक नवा शब्द मोठ्याने वाचून दाखवतं — आणि वाटेवरचं झाड वाढतं.

🌼

रोज १० मिनिटं

रविवारी तासभरापेक्षा रोज थोडं खूप चांगलं. जुनी अक्षरं विसरण्याआधीच ॲप ती आपोआप परत आणतं.

🔒

पालकांचा विभाग

काय छान चाललंय, कशाचा सराव हवा — हे पालक विभागात दिसतं. तो फक्त मोठ्यांना सुटेल अशा प्रश्नामागे आहे.

रोजची सवय

रोज १० मिनिटं, रोज

नवं अक्षर परत समोर आलं नाही तर मुलं ते काही दिवसांत विसरतात. म्हणून प्रत्येक वेळी सुरुवात आजच्या “आठवणीच्या” अक्षरांनी होते — कोणती ते ॲप स्वतः ठरवतं.

२ मिनिटं
आधी आठवूया
आज परत यायची २–३ जुनी अक्षरं
५ मिनिटं
एक नवी पायरी
नवं अक्षर, मात्रा, किंवा नवे शब्द
३ मिनिटं
वही
लिहा आणि आई-बाबांना दाखवा
🌼
एक फूल
आठवड्यातल्या प्रत्येक सरावाच्या दिवसासाठी
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

रोजचा सराव का महत्त्वाचा, आणि सवय कशी टिकवायची →

मोफत छापा

प्रत्येक अक्षराची सराव पत्रिका

ॲपमध्ये शिकवतो तोच रेघ-क्रम — क्रमांकांसह, गिरवायला अक्षरं आणि लिहायला चौकटी. एक पत्रिका छापा, किंवा सगळी ४२.

🖨️ सराव पत्रिका उघडा

मुलाची गोपनीयता

फोनबाहेर काहीही जात नाही

अक्षरपाखरू पूर्ण ऑफलाइन चालतं. खातं लागत नाही, जाहिराती नाहीत, कोणतीही माहिती गोळा होत नाही. प्रगती फक्त तुमच्या फोनमध्ये राहते.

✓ ऑफलाइन चालतं✓ जाहिराती नाहीत✓ खातं नाही ✓ मागोवा नाही✓ आतमध्ये खरेदी नाही

गोपनीयता धोरण वाचा →

प्रश्न

पालक विचारतात

माझं मूल CBSE / इंग्रजी माध्यमात आहे. हे आमच्यासाठी आहे का?

हो. ॲप बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकाचा क्रम पाळतं, पण ते प्रत्येक मराठी घरासाठी आहे — मुलाची शाळा कोणत्याही बोर्डाची असो. जिथे घरोघरी अक्षर पुस्तकापेक्षा वेगळं काढतात, तिथे आम्ही पालकांच्या सवयीचं ठेवलं आहे.

घरी मराठी बोलत नाही. तरी मूल वापरू शकेल का?

हो — ॲप सुरू होताना सूचनांची भाषा English निवडा. मग सूचना त्या भाषेत ऐकू येतात, आणि प्रत्येक मराठी शब्दानंतर त्याचा अर्थ. शिकवलं मात्र मराठीच जातं.

मूल स्क्रीनवर लिहितं का?

ॲप प्रत्येक अक्षर रेघ-रेघ कसं काढायचं ते दाखवतं; खरं लिहिणं वहीत, तुमच्या देखरेखीखाली. पेन्सिल-कागदाने हाताला जी सवय लागते ती स्क्रीनवर बोट फिरवून लागत नाही.

मूल किती दिवसांत वाचू लागेल?

पहिली पाच अक्षरं आणि काना झाला की लगेच पहिले शब्द येतात — काका, मामा, मका. प्रत्येक मुलाचा वेग वेगळा असतो; लांब सत्रांपेक्षा रोज १० मिनिटं खूप जास्त महत्त्वाची.

हे मोफत आहे का?

हो. जाहिराती नाहीत, ॲपमध्ये काहीही विकत घ्यावं लागत नाही.

लवकरच Google Play वर

आधी वापरून बघायचं आहे, किंवा काही सुचवायचं आहे? लिहा: hello@abhijitvaidya.in